टॉन्सिल्स आजारांचे कुतूहल : टॉन्सिल्स
टॉन्सिल्सचा त्रास ही एक खूप मोठय़ा प्रमाणावर आढळणारी तक्रार आहे.
‘सुश्रुत’ या आयुर्वेदीय शल्यविशारदाने याला ‘गिलायु’ अशी संज्ञा दिली आहे. ‘गिलायु’ या घशाच्या ठिकाणी असणाऱ्या दोन गाठी आहेत. त्याची वृद्धी झाल्यास हा रोग निर्माण होतो. घशाच्या ठिकाणी आढळणारा हा रोग आहे. कफदोष आणि रक्तधातू यांमध्ये बिघाड झाल्यास या रोगाची उत्पती होते. कफदोष वाढल्यामुळे नेहमी सर्दी-पडशाची तक्रार असणाऱ्यांमध्ये टॉन्सिल्स वाढल्या आहेत का याची खातरजमा करून घेतली जाते.
थंड पदार्थ, आईस्क्रीम, शीतपेये, थंडगार पाणी अशा पदार्थाचे सतत आणि अधिक प्रमाणात सेवन केल्यास टॉन्सिल्सची अधिक वाढ होते.
टॉन्सिल्सना त्यामुळे सूज येते आणि टॉन्सिल्स वाढल्या आहेत, असे समजले जाते. दह्य़ासारख्या पदार्थाचे सततचे सेवनही या विकाराला कारणीभूत ठरते. खूप थंड वातावरणात राहणे, थंड हवा घशाला लागणे, वाहनावर बसलेले असताना घशाची काळजी न घेणे ही पूरक कारणेही टॉन्सिल्सच्या त्रासाला आधारभूत ठरतात.
चवीला अतिशय आंबट तसेच घशाला न मानवणारे पदार्थ सेवन करणे हेही या त्रासाला कारणीभूत ठरू शकते. टॉन्सिल्सना या वरील कारणांमुळे सूज येते आणि मग स्थानिक व सार्वदेहिक अशी या रोगाची लक्षणे दिसू लागतात.
या रोगात घशात काही अडकल्यासारखे होते. गाठी सुजल्यामुळे अन्न गिळायला त्रास होतो. अंगात ताप येतो. वारंवार सर्दी-पडसे होण्याची प्रवृत्ती बळावते. बोलायला त्रास होतो. काहीवेळा कानातही त्यामुळे वेदना होतात. अशा अवस्थेत घशाचे परीक्षण केले असता या गाठी लाल झालेल्या दिसतात.
बाहेरून घशाला स्पर्श केल्यास वेदना होतात. या वाढलेल्या गाठींकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास या सुजेची पुढील अवस्था निर्माण होते.
म्हणून टान्सिल्सचा त्रास होतो आहे, असे लक्षात आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. विशेषत: पालकांनी याकडे अधिक लक्ष द्यावे. कारण अनेकदा लहान मुलांना केवळ सर्दी-खोकल्याचा त्रास होतो म्हणून त्यांचे पालक काहीतरी घरगुती उपचार त्यावर करत असतात. हा त्रास टॉन्सिल्समुळे आहे की काय हे पालकांनी वैद्यकीय सल्लय़ाने ठरवून त्यावर वेळीच उपचार करून घ्यावेत. शाळांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यावर विशेषत्वाने या रोगाचा त्रास मुलांना होत असल्याची जाणीव होते. त्यामुळे मुलांच्या पालकांनी या बाबतीत योग्य ते लक्ष पुरवणे आवश्यक वाटते.
टॉन्सिल्सवरील उपचार:-
टॉन्सिल्सवरील उपचारांचा एक प्रमुख भाग म्हणजे या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या अशा पदार्थाचे सेवन त्वरित बंद करणे. थंड पदार्थ- पाणी, वारा या सर्व गोष्टी टॉन्सिल्सना प्रतिकूल आहेत. हे घटक असेच सेवन करत राहिल्यास मग पुढे शस्त्रकर्म हाच टॉन्सिल्सच्या त्रासावर एकमेव मार्ग ठरतो. तो टाळायचा असेल तर प्रथम आपल्या स्वैर खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आता दुसरा भाग राहतो प्रत्यक्ष उपचारांचा. यामध्ये गुळण्यांना खूप महत्त्व आहे. गरम पाण्यामध्ये थोडे मीठ व थोडी हळद घालून त्याने गुळण्या केल्यास टॉन्सिल्सचा त्रास कमी होतो.
टॉन्सिल्स वाढल्यावर येणाऱ्या तापावर त्रिभुवनकीर्ती, महाज्वरांकुश अशी काही औषधे त्या त्या अवस्थेनुसार लागू पडतात. तसेच त्रिफळा-गुग्गुळ अशी काही औषधे वापरल्यास प्रतिबंध होऊ शकतो.घशाच्या बाहेरील बाजूने काही वेळा लेपगोळीने लेप केल्यास टॉन्सिल्सच्या सुजेवर तो परिणामकारी ठरतो. अर्थात हे सर्व वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करणे चांगले.
0 टिप्पण्या