बहुगुणी चंदन


 

                          बहुगुणी चंदन 

          आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो.
        विशेषतः, भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. 
     इतकेच काय, पण वेदपठन करणारे विद्वान देखील आपल्या कपाळावर चंदनाचा लेप लावताना पाहायला मिळतात. 
        याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय चंदनामध्ये अनेक औषधी गुण आहेत.     
     कपाळावर चंदन लावण्याला अध्यात्मिक दृष्टीने महत्व आहेच, पण त्याशिवाय यामध्ये असलेल्या अनेक औषधी गुणांमुळे शरीरामध्ये उद्भविणारे अनेक लहान मोठे विकार बरे होण्यास मदत होते.
      चंदन थंड असल्याने ज्या व्यक्तींना सतत उष्णतेचा त्रास होत असेल, त्यांनी चंदनाचा वापर करावा. 
    कपाळावर चंदनाचा लेप दिल्याने डोकेदुखी शमण्यास मदत होते.
      विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप वेळ उन्हात फिरल्याने डोके दुखण्यास सुरुवात होते. या डोकेदुखीसाठी चंदनाचा लेप विशेष गुणकारी आहे. चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते. याच कारणासाठी पूर्वीच्या काळी वेदपठन करणारे ब्राम्हण कपाळावर चंदनाचा टिळा लावत असत. 
    चंदन लावल्याने मेंदू थंड आणि शांत राहतो त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. जेव्हा ताप येतो तेव्हा गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्याने ताप कमी होण्यास मदत मिळते. हेच काम चंदनाचा लेप देखील करतो. ताप आला असल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावावा. यामुळे अंगातील उष्णता कमी होते, व शरीराचे तापमान कमी होऊन ताप उतरतो. 
         जर रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल किंवा मनावर कोणत्याही गोष्टीचा ताण असल्याने झोप लागत नसेल, तर कपाळावर चंदनाचा लेप द्यावा. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होईल. जास्त विचार करीत राहिल्याने मनावर ताण येतो. हा ताण कमी करण्यास ही चंदनाच्या लेपामुळे मदत होते. 
         जर चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या येत असतील, किंवा काळे डाग असतील, तर चंदनाचा लेप चेहऱ्यावर लावावा. ज्यांची त्वचा खूप तेलकट असेल, त्यांच्या चेहऱ्यावर सतत अॅक्ने येत असतात. चंदनाचा लेप लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन अॅक्ने देखील कमी होण्यास मदत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या