शेवगा


                                     शेवगा

             शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गुणधर्म आज आपण पाहणार आहोत.     
        शास्त्रीय नाव:- मॉरिंगा ओलेफेरा 

        हवामान:- या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते. 

       उंची :- साधारण उंची १० मी. असते. 

       प्रमुख उपयोग :- 
                                शेवग्याच्या शेंगा कालवण, कढी, आमटी किंवा सुकी भाजीत शिजवून खाल्ल्या जातात. या झाडाची पाने, फुले, फळं, साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. 
         बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून आपण भाजी बनवू शकतो. 
         शेवगा हा हाडांसाठी वरदान आहे. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात. 
       कोवळ्या पानांची भाजी महाराष्ट्रात मृग नक्षत्रात केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील वातदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी तेव्हा आवर्जून खाल्ली जाते. 

       शेवग्याचे आयुर्वेदिक गुणधर्म  :-
 
      १) हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित सेवन करावी. 
       २) वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा. 
       ३) शारीरिक दौर्बल्य असल्यास शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात घ्याव्यात. 
       ४) तसेच संधिवात, नेत्ररोग, स्नायूंची कमजोरी या व्याधी देखील बऱ्या होतात. 
       ५) शेवगा हा उष्ण आहे म्हणून त्याचा वात आणि कफ या प्रकारच्या विकारांवर उत्तम उपयोग होतो. 
       ६) शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
        ७) शरीरावर किंवा शरीराच्या आतील भागात आलेली सूज शेवग्याच्या सालीच्या काढ्याने कमी होते. 
        ८) डोकेदुखी व जडपणा यावर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.
        ९) शेवगा जंतनाशक असल्याने पोटातील कृमी विष्ठेवाटे बाहेर पडतात. 
        १०) रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांमध्ये शेवगा गुणकारी आहे. 

 सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग :–
                                                अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो. जसे अन्न तसे मन आणि शरीर, या उक्तीप्रमाणे तुम्ही शेवगा नियमित सेवन करत असाल तर तुमचे साैंदर्य खुलवण्यात नक्कीच सहयोग होईल. त्वचाविकार, थकवा, आणि डोळ्यांचे विकार यामध्ये शेवगा नियमित सेवन करा. नक्कीच लाभ होईल व शारीरिक कांती उजळेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या