लोकराजा शाहू महाराज बालपण आणि जडणघडण
आपल्या संस्कृतीत 'राजा' हा विष्णूचा अवतार समजला जातो. विष्णू जगाचे पालन करणारा .शिवाजीमहाराजांनी हे लोकपालनाचे -लोककल्याणाचे काम अत्यंत समर्थपणे पार पाडले. त्याच वंशात शाहूमहाराजांनी आपल्या कार्याने 'लोकराजा 'हे नाव सार्थ केले.
शाहू महाराज हे कोल्हापूरचे गादीवर दत्तक पुत्र म्हणून 'राजा' झाले .त्यांचा जन्म 26 जुलै 1874 मध्ये कोल्हापूर येथे झाला.
इ.स.वीसन 1884 मध्ये यशवंताला दत्तक देण्याचा सोहळा झाला. 17 मार्च ते 21 मार्च असे पाच दिवस हा अपूर्व सोहळा साजरा झाला .इंग्रज सरकारने या दत्तक विधानाला मंजुरी दिली .एवढेच नाही तर इंग्रज प्रतिनिधी कर्नल रीव्हज् आणि इंग्रज अधिकारी या सोहळ्यात सहभागी झाले.
या अपूर्व राज्यरोहण सोहळ्यात मुंबईहून, पुण्याहून प्रतिष्ठित माणसे आली होती .शाहू भविष्यात 'श्रेष्ठ राजा 'म्हणून नाव मिळवणार याची सर्वांना खात्री होती .पुण्याच्या सार्वजनिक सभेतर्फे एक मानपत्र शाहू महाराजांना सादर करण्यात आले. त्या मानपत्राचे वाचन संस्थेचे कार्यवाह सिताराम हरी चिपळूणकर यांनी केले. त्यामधील महत्त्वाचा मजकूर लक्षात घेण्यासारखा आहे -
"श्रीमंत बाबासाहेबांच्या (वडिलांच्या) कुशल मार्गदर्शनाखाली शाहू छत्रपती लवकरच समर्थ आणि प्रजाहित दक्ष असे राजे होतील आणि त्यांच्याकडून कोल्हापूर संस्थानातील रेल्वे वाहतूक ,साखरउद्योग आणि राजाराम महाविद्यालयात उच्च शैक्षणिक संस्थेच्या योग्य विस्तारीकरणाला अधिक प्रेरणा लाभून कोल्हापूर संस्थान हे आदर्श राज्य होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."
हा विश्वास खरात झाला. दत्तक दिल्यानंतर वडील आबासाहेब घाटगे यांनी मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे ठरविले .आपला मुलगा आता राजा आहे, त्यामुळे त्याला चतुरस्त्र शिक्षण हवे. लहान वयात इतक्या लांब पाठविण्या ऐवजी भारतातच एखाद्या चांगल्या संस्थेत शिक्षण व्हावे असे ठरले. शिक्षणासाठी राजकोट येथे राजकुमार कॉलेजात त्यांना पाठविण्याचा निर्णय झाला .कॉलेजचे प्राचार्य मॅकनाॅटन नावाचे इंग्रज अधिकारी होते. त्यांच्याशी बाबासाहेबांनी बोलणी केली.
राजकोट ला जाण्यापूर्वी शाहूंचे शिक्षण गोखले गुरुजींकडे उत्तम प्रकारे चालू होतेच. गोखले उत्तम शिक्षक होते. भविष्यात हा आपला विद्यार्थी 'राजा 'होणार याची त्यांना कल्पना होती. राजा बहुश्रुत हवा, आपल्या देशाची, संस्कृतीची त्याला ओळख व्हायला हवी. या दृष्टीने राजकोट ला जाण्याचे अगोदरच शाहूंना भारताचा इतिहास, भारताचा आणि आशिया खंडाचा भूगोल ,जगाचा प्राथमिक भूगोल याची माहिती झाली होती. ते ही चांगली चित्रे काढीत असत .नानासाहेब इंगळे आणि बुवासाहेब इंगळे यांच्या तालमीत ते शारीरिक कसरत शिकत होते. घोड्यावर स्वार होणे ,घोडा काबूत ठेऊन त्याला चौखूर उधळून फिरवून आणणे, कुस्ती, दांडपट्टा ,लाठी असे व्यायामाचे खेळ खेळणे ,शिकार करणे अशा प्रकारे शाहू महाराजांचे शरीरही तयार होत होते. इंग्रज अधिकार्याच्या बरोबर संपर्क साधावा लागेल या दृष्टीने इंग्रजी विषयाकडे ही विशेष लक्ष पुरवले गेले.
31 डिसेंबर1885 रोजी शाहू छत्रपती ची रवानगी पुढील शिक्षणासाठी राजकोटला झाली .तिथे त्यांच्या बरोबर त्यांचे धाकटे बंधू आणि कोल्हापूर मधील इतर मित्र मंडळी होते. शाहूराजे राजकोट ला शिकत असताना इकडे बाबासाहेब घाडगे यांचा मृत्यू झाला. शाहूराजे पोरके झाले .
ते एकदा कोल्हापूरला आले असता एक घटना घडली .शाहूराजे सर्व सामान्य लोकांत मिसळत .अठरा पगड जातीची माणसे त्यांना प्रेमाने भेटायला येत. वेगवेगळ्या धर्माचे माणसे येत. सर्वांना तेथे मुक्त प्रवेश होता . बाळ राजेशाहू सर्वांचे म्हणणे प्रेमाने ऐकून घेई. याचा त्यांचे गुरूजी गोखले यांना राग येई.त्यांना वाटे, राजाने राजासारखे रुबाबात राहायला हवे. या कनिष्ठ लोकांमध्ये त्यांनी असे मिसळणे योग्य नव्हे .त्यांनी शाहुराजांना विनंती केली .
"राजे, तुम्ही आपल्या राजे पणाला शोभेल असं वागावं; सरदार, इनामदार, जहागीरदार यांच्या संगतीत रहायला हवा."
शाहूराजे ताडकन म्हणाले -"अहो ,आमच्या वडिलांच्या संगती मधील या लब्धप्रतिष्ठित मित्रांना चांगले ओळखतो. या प्रतिष्ठित मला संगत नको आणि त्यांचे ते दुर्गुनही मला नकोत."
शाहू छत्रपती पुढच्या आयुष्यातही शेतकरी ,कामकरी अशा सामान्य माणसातच रमले. अस्पृश्य ,महार-मांग यांच्याविषयी त्यांच्या मनात अपार करुणा होती .हा ब्राह्मण,हा उच्चकुळीचा मराठा ,हा हीन अस्पृश्य असा भेदभाव त्यांनी आयुष्यात गेला नाही म्हणूनच ते लोकराजा ठरले.
सुमारे तीन-साडेतीन वर्ष ते राजकोट शिक्षणासाठी राहिले. पुढे आपल्या 'राजा' म्हणून भूमिका बजावयाची आहे याची सतत जाणीव त्यांच्या मनात होती .याच कालात सुट्टीत कोल्हापूरला आल्यावर राज्याच्या विविध भागात जाऊन त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. आपली भूमी पाहीली.राज्यातील झाडे, वृक्ष संपत्ती, जलसंपत्ती पीक पाणी,अशा अनेक गोष्टींविषयी शाहूराजे ओळख करून घेत होते. ते स्वतः मोडी लिपी शिकले. ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यरोहणाचा सोहळा भारतात अनेक ठिकाणी झाला .तसा तो कोल्हापूर येथे झाला. राजकोट इथून ते कोल्हापूरला फेब्रुवारी 1887 मध्ये समारंभाला आले .पुढच्या सत्राचा अभ्यास त्यांनी घरीच करून परीक्षा दिली.
इंग्रजांनी राज्य चालवताना अनेक गोष्टी केल्या.तारयंत्रे, पोस्ट खाते ,रेल्वे अशा सुविधा भारतात आल्या .कोल्हापूर रेल्वे मार्गाचे उद्घाटन 3 मे 1888 रोजी झाले. हा सोहळा यांच्या हस्ते मोठ्या समारंभाने झाला. यावेळी शाहूराजे फक्त चौदा वर्षाचे होते. परंतु मुळातच त्यांची समज उत्तम होती. 14 वर्षाच्या शाहू राजा यांनी आपले सार्वजनिक भाषण त्या दिवशी प्रथमच केले. ते आत्मविश्वासाने चांगले बोलले. ते म्हणाले -"हा नवीन लोहमार्ग पूर्ण झाल्यावर या राज्याच्या संपत्तीत भर पडेल. आमच्या हाती सत्ता येण्यापूर्वी प्रजा हिताच्या दृष्टीने जे जे शक्य आहे ते ते करण्यात येईल .लोहमार्ग हा त्यापैकीच एक आहे ."
शाहूंराजाच्या मनातही बालवयातच 'लोककल्याण' करण्याची दृष्टी पक्की होती. शहाणपण वयावर नसतेच मुळी!
पुढचे शिक्षण धारवाड येथे करण्याचे ठरले . स्टुअर्ट मिंटफोर्ड फ्रेंजर नावाचे इंग्रज अधिकारी होते. ते उदार, विवेकी, आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात.1889 मध्ये शाहुराजांचे आणि त्यांच्या काही मित्रांचे शिक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले .
सर्व मुले सकाळी साडेसहाला उठत. लांब मोकळ्या मैदानावर घोड्यावरून रपेट, लांब चालणे ,व्यायाम, नेमबाजी असा सारा व्यायाम बुवा साहेब पिंगळे घेतअसत. सकाळी दहा ते पाच अभ्यासाचे वर्ग असत. दुपारी एक ते दोन भोजनाची सुट्टी असे. सर्व सुटल्यावर टेनिस ,मैदानी खेळ तसेच दांडपट्टा, लाठी वगैरे व्यायाम शिकवले जात. संध्याकाळचे जेवण तसे लवकरच असेल .जेवणानंतर तास दोन तास सर्व मुले वर्गपाठ ,अभ्यास करीत.
1889ते1893 या चार वर्षांच्या काळामध्ये शाहूराजे यांचे शिक्षण उत्तम झाले. त्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास उत्तम झाला. तसेच व्यायामाने शरीर उत्तम झाले .शिक्षण संपवून राजे कोल्हापूरला परत आले तेव्हा त्यांच्या दर्शनाने कोल्हापूरचे नागरिक आनंदित झाले. 5 फुट 11 इंच अशी पूर्ण उंची ,गोल चेहरा ,काहीसा आडवा बांधा, करारी तरीही उदार अशी वृत्ती .लोकांची मने जिंकील असे चेहर्यावरील भाव .अशा राज्याच्या दर्शनाने लोकांच्या मनात नकळत भावना उमटली.हा आपला राजा !लोकराजा !
चौदाव्या वर्षी धारवाडला गेलेले बाळ शाहूराजे धारवाडहून कोल्हापूरला परतले ते एक समंजस,कनवाळु,दिलदार,सरळ मनाचा, सत्यनिष्ठ ,सेवाभावी, लोकहित ,तत्पर,उमदा, तेजस्वी तरुण म्हणून! कोल्हापूर वासियांची खात्री पटली ,आपण भाग्यवान आहोत! शिवाजी महाराजांची परंपरा राखणारा राजा मिळाला आहे.
भारत भ्रमण आणि राज्याभिषेक
शाहू राजे धारवाड येथे शिकत असताना त्यांचा विवाह झाला. विवाह समयी शाहूराजे यांचे वय 17 पूर्ण होते .त्यांची पत्नी लक्ष्मी चे लग्नत वय अकरा होते .1एप्रिल 1891 रोजी हा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. त्या काळात बालविवाहाचे संदर्भात लोक जागृती निर्माण होत होती. संमती वयाचा कायदा येणार होता. शाहू राजे समंजस होते. त्यामुळे लक्ष्मी मोठी होईपर्यंत म्हणजे 1894 पर्यंत थोडे दिवस माहेरी सासरी अशीच राहात होती. ती वयात आल्यावर 1894 नंतर खऱ्या अर्थाने शाहू राजे यांचा संसार सुरू झाला.
धारवाडला शिकत असताना फ्रेंजर साहेबांनी आपल्या सतशिष्याला- शाहुराजांना भारत भ्रमण करून आणण्याचे ठरविले. पुस्तकी ज्ञान जेवढे महत्त्वाचे असते तेवढे जीवनात प्रत्यक्ष अनुभवानी येणारे शहाणपण फार मोलाचे असते. 16 नोव्हेंबर 1890 रोजी हे भारत भ्रमण सुरू झाले. दत्ताजीराव इंगळे, बुवा साहेब ,इंगळे, शाहूराजे, शाहू राजांचे काही मित्र आणि सर्वांची योग्य देखभाल करण्यासाठी अशी सारी मंडळी निघाली .
पहिला मुक्काम नाशिक येथे केला .नाशिकचे घाटावर गेले असता पंडे आणि पोटार्थी भटजी आसलेल्या भक्तांना सळो की पळो करीत .त्याने त्यांचे मन विषण्ण झाले .एक राजा म्हणून काम करताना या अनुभवातून एक दिशा मिळाली. धार्मिक तीर्थस्थळे निवांत हवीत अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली .
नाशिकहुन जबलपुर ,काशीविश्वेश्वराचे दर्शन. गंगेच्या प्रवाहात सोडले जाणारे लाखो दिवे, हे सारे सौंदर्य पाहून त्यांचे मन तृप्त झाले. तरी प्रत्येक ठिकाणी पवित्र स्थळी असणारी अस्वच्छता ओंगळपणा त्यांचे मन विषण्ण करीत असे. तिथून कलकत्ता नंतर दार्जिलिंग येथे सर्व मंडळी गेली. आग्रा येथिल ताजमहल, दिल्लीचा कुतुब मिनार, जुम्मा मस्जिद पाहून सारी जयपुर ला गेली .राजस्थान मधील अप्रतिम कामगिरी पाहून शाहुराजांचे मन खूपच प्रसन्न झाले. उत्तर भारताचा हा सुमारे पाच हजार मैलाचा दीर्घ प्रवास होता .
दुसरा प्रवास यात्रा दक्षिण भारताची झाली .हैदराबाद, विजापूर ,मद्रास,पॉंडेचरी,श्रीरंगपट्टन, धारवाड, बेळगाव असा पुष्कळसा दक्षिण भारत पाहिला .या प्रवासात शाहूराजांनी तंजावरला भेट दिली.
भोसले घराण्यातील आपल्या श्रेष्ठ पाहताना ते नम्र झाले.मनी जनु खून बांधली.' आपल्याला भविष्यात शिवाजी महाराजांचा आदर्श जपायचा आहे.' सरफोजी राजांचे प्रचंड मोठी ग्रंथालय पाहून ज्ञानाचे संवर्धन आणि जतन हा राजधर्म आहे असा विचार शाहू राजांच्या मनात आला .
तिसऱ्या सहलीत राजपुताना, पंजाब, सिंध प्रांतांना सर्वांनी भेट दिल्या.
या तीन सहलीतुन शाहुराजांना संपूर्ण भारताचे दर्शन फ्रेजर साहेबांनी घडविले .त्यातून अनेक गोष्टी साधल्या .प्रांता-प्रांताततील विविधता त्यांनी अनुभवली. लोककला, हस्तकला ,वस्त्रकला, यामध्ये प्रत्येक प्रांत आपले असे एक वेगळेच सौंदर्य जपताना त्यांना जाणवले .निरीक्षण ,प्रत्यक्ष अनुभव यामुळे सहजपणाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या .एक लोक कल्याणकारक, चतुरस्त्र राजा म्हणून पुढे शाहूराजांनी लौकिक मिळवला. त्यांची पूर्वतयारी करायला या प्रवासाने मदत केली. एवढं निश्चित.
गुरुवर्य फ्रेजर आणि गुरुवर्य कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शाहूराजे यांचे शिक्षण पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात शाहू राजे यांचा विवाह झाला .शाहू राजे यांनी आपल्या पत्नीच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था केली.
भारत-भ्रमण झाल्यावर शाहूराजांनी महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर संस्थाना मधील, सर्व भाग जातीने हिंडून पाहिला .राज्यपाल हॅरिस यांच्याबरोबर चिंचली गावी येथे घोडे, इतर शेतीची जनावरे या प्रदर्शनाला शाहूराजांनी भेट दिली. हा देश शेतीप्रधान आहे .शेतकरी हाच या देशातील उद्योग आणि व्यापार याचा कणाआहे. याची शाहू महाराजांना जाणीव होती.
कोल्हापूर क्षेत्राच्या प्रत्यक्ष राज्य कारभाराची सूत्रे हाती घेण्यास शाहूराजे आता योग्य रित्या तयार झाल्याची राज्यपाल वार्ड हॅरिस यांना खात्री पटली .न्यायपद्धती ,कायदे,भारतीय राज नैतिक निर्बंध याविषयी शाहू महाराजांना माहिती दिलेली होती. तसेच राज्यकारभार चालवताना कसे वागावे यासंबंधी अनेक गोष्टी त्यांनी समजून घेतल्या होत्या. महसूल म्हणजे राज्यांमध्ये येणारा महत्त्वाचा पैशाचा ओघ. त्याची अंमलबजावणी लोक माणूस जाणून व्यवस्थित व्हायला हवी .राज्यकारभारात कामाची विविध खाती कोणती ?त्यांचे काम कोणत्या प्रकारचे; या खात्यावर खर्च होणारा पैसा किती याची सर्व माहिती शाहूराजांनी करून घेतली .अधिकाऱ्यांवर विश्वास तरहवाच . परंतु त्यांच्या हातून काम उत्तम आणि अचूक होते आहे ना यावरही सूक्ष्म लक्ष हवे! महत्त्वाच्या कामाला मंजुरी देताना राजाने सर्व तपशील व्यवस्थित वाचूनच सही करायला हवी .अशा कितीतरी गोष्टी शाहूराजांनी समजून घेतल्या होत्या.
2एप्रिल 1894 दिवस शाहुराजांच्या राज्यरोहण यासाठी निश्चित करण्यात आला. कोल्हापूर मधील लोकांना एक वेगळाच आनंद झाला .लॉर्ड हॅरिस यांच्या निवासस्थानी शाहुराजांना इंग्रज सन्मानपूर्वक कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रे सोपवली.त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता राज्य रोहनचा खास समारंभ राजवाड्यात सुरू झाला .
19 तोफांची सलामी झाली ,तुताऱ्या निनादल्या. भोसले वंशातील एक बलशाली ,सामर्थ्यशाली ,उदार राजा सिंहासनावर विराजमान झाला .संपूर्ण राजवाडा फुलांनी सजवला होता .या समारंभासाठी मुधोळ ,सांगली,-मिरज, जमखिंडी, कुंदुर वाडा या संस्थांचे अधिपती सरदार 'खास' नजराणे घेऊन जातीने हजर होते.
याच दिवशी शाहूराजांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला .
"स्वस्तिश्री राज्याभिषेक शके 220 विजयनाम संवस्तरे फाल्गुन वद्य 11इंदुवासरे क्षत्रिय कुलावंतस..... श्री शाहू छत्रपती याजकडून या जाहीरनाम्यात द्वारे कोल्हापूर जाहीरनाम्या व्दारे कोल्हापूर आवाक्यातील तमाम प्रजाजनास जाहीर करण्यात येते की..... आमच्या राज्याच्या पूर्ण अखत्यार आमच्या हाती आला आहे..... आमची सर्व प्रजा सतत त्रूप्तराहून सुखी असावी. तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्था हरप्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे.
हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान-थोर जहागीरदार, सरदार,आप्त सरदार, मानकरि,आम्हास सहाय्य करतील. ही आमची कारकीर्द दीर्घकाळापर्यंत चालवून सफल करावी अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावेप्रार्थना करतो ."शाहूराजे भविष्यात एक 'जाणता राजा' म्हणून राज्यकारभार करत याची सर्वांना खात्री पटली .बहुजन हिताय, बहुजन सुखाय असे राज्य करणारा एक पुण्यवंत, नीतीवंत राजा मिळाला म्हणून सर्व नागरिक आनंदित होते.
लोकांचा राजा
राजवाड्यात ला एक अधिकारी तुपाची हा सगळा गलका एकूण व्हरांड्यातुन जाणारे शाहू महाराज तिथेआले. वाड्यातील नोकर-चाकर तिथे जमले होते. खासगीतला अधिकारी त्या गरीब माणसाला धमकावीत होता .त्या अधिकाऱ्याने त्या तुपचोराला राजापुढे ढकलीत म्हटले-
" महाराज, चार ठाव खायला मिळतं इथे ,तरी चोरीची बुद्धी!"
तो गरीब माणूस राजाच्या पायावर कोसळला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते .आता पाठीवर आसुडाचे फटके बसणार या कल्पनेने तो गर्भ गळीत झाला होता .परंतु झाले उलटेच!असुरांचा फटका बसलाच नाही .त्याच्या पाठीवर हात फिरवत शाहूराजांनी त्याला उभे केले-" सांग पाहू का केलीस चोरी?"
तो गरीब माणूस उभा राहिला. हात जोडीत म्हणाला-" महाराज, घरी बाई बाळंत हाय. घरात खायस्नी काई नाय. लेकराला दूध कसं मिळणार म्हणून..."
" बरं....बरं...परत चोरी करायची नाही ."
आणि आपल्या खाजगीतील अधिकाऱ्याला शाहू राजे म्हणाले-
ईआ " एक उत्तम तांदळाचे पोते आणि एक तुपाचा डबा यांच्या घरी पाठवून द्या."
सारी मंडळी अवाक झाली .पाठ मोरया जाणाऱ्या आपल्या उदार राजा कडे पहात राहिली.
शाहूराजे गादीवर आल्यावर प्रथमच त्यांनी आपल्या राज्य कारभाराकडे लक्ष दिले. पूर्वीचे प्रशासन मंडळ त्यांनी बरखास्त केले.कृषी,महसुली,न्याय, आरोग्य अशी स्वतंत्र व्यवस्था केली. प्रत्येक खात्यावर एक दीवाना आणि त्यांच्या हाताखाली तीन प्रमुख अधिकारी .या सर्वांना एकत्रित बांधणे महत्त्वाचे होते. म्हणून राज्यकारभारात मदत करण्यासाठी 'हुजूर कार्यालय 'ही नवीन व्यवस्था झाली .'हुजूर चिटणीस' हा सर्व व्यवस्थेचा प्रमुख सूत्रधार. गुरुवर्य फ्रेजर यांच्या सल्ल्यानुसार रघुनाथ व्यंकोजी सबनीस यांची 'हुजूरचिटणीस' म्हणून नेमणूक केली .राज्य कारभार हाती घेतल्यावर हजारो प्रकारचे धूळ खात पडलेली पडली होती. त्यांचा निवाडा शाहू राजांनी केला. लोकांच्या लहानसहान गोष्टींमध्ये ही ते जातीने लक्ष घातल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला.
राज्यकारभार हाती आल्यावर दोन वर्षातच राजांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या .फार पूर्वीपासून सर्वत्र वेठबिगारी होती .माणसाला गुलाम म्हणून त्यांच्यापासून वाटेल ते काम करून घ्यावे आणि त्यांना पशुतुल्य वागणूक द्यावी अशीही वेठबिगारी. शाहूमहाराजांनी गरिबांची या मधून सुटका केली. गरिबाला ही' 'माणूस' म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली .माणसाला उद्योग निर्माण करून त्याला 'वेतन' म्हणून पगार मिळण्याचा अधिकार मिळाला .व्यापारी मंडळी म्हणजे ग्राहकांना लुबाडणे हा आपला हक्क समजत .व्यापाऱ्यांवर जरब बसवली. भ्रष्टाचार व फसवणूक यासाठी निश्चित शिक्षा झाल्याने गरिबांची जीवन निश्चित झाले. भारत आपला शेतीप्रधान देश. शेतकरी सुखी तर देश सुखी. शाहूराजांनी शेतकऱ्यासाठी आणि गोष्टी केल्या .राज्यामधील सरकारी चराऊ कुरणे गोरगरिबांच्या जनावरांसाठी मुक्त केली .गाईगुरांच्याऔषध पाण्यासाठी गुरांचे दवाखाने सुरू झाले. माणूस शिकला तर देश सुधारणा यामुळे सामान्य माणसाला शिक्षण मिळावे या दृष्टीने खास शिक्षण समिती नेमुनअनेक शाळांची योजना केली. राजाराम कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण सुरू झाले .बालमित्रांनो ,डोंगराळ भागात राहणारे आदिवासी, त्यांना शिक्षण, नोकरी, नाही. शाहूराजांनी या आदिवासी यांना राज्याच्या सेवेत नोकऱ्या शिक्षण नोकर्या दिल्या.शाहूमहाराजांच्या सहज वागण्यातून लोकानच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. राज्यकारभाराची यशस्वी अशी दोन वर्षे.
कार्तिकाचा महिना.1899 साल.पहाट झाली होती. आकाशातील चांदण्या फिकट झाल्या आणि पूर्व दिशेकडे किंचित उजळू लागले होते .पंचगंगेच्या गार पाण्यात शाहूराजे उतरले होते. बरोबर होते धाकटे बंधू बापूसाहेब .नारायण भटजी काठावर स्नान करताना म्हणायचे मंत्र म्हणत होते .
त्यांनी स्नान केले नाही हे महाराजांना समजले आणि ते मित्रही वेदोक्त न म्हणता पुराणोक्त म्हणत होते.
राजे मनातून संतापले. तरी ते शांत राहिले.
त्या काळात घरात खूप धार्मिक गोष्टी होत. त्या मध्ये ब्राम्हण आणि क्षत्रियांकडे वेदोक्त विधी होत तर शुद्रांकडे (वैश्यांकडेही) पुराणोक्त विधी होत .परशुरामाने पृथ्वी एकवीस वेळा नि:क्षत्रिय केली अशी एक कथा .त्यामुळे ब्राह्मणांचे म्हणे आता क्षत्रिय पृथ्वीवर नाहीतच. त्यामुळे मराठा हे शुद्रच ठरतात . त्यामुळे मराठा असलेल्या शाहू राजांकडे सर्व विधी आम्ही पुराणोक्त करणार. तर शाहूराजे म्हणत होते ,आम्ही भोसले .म्हणून शिवाजींच्या वंशातले. शिवाजीला राजे पद मिळाले ते क्षत्रिय म्हणून; तेव्हा आम्हाला शूद्र ठरविणारे तुम्ही कोण? हा वेदोक्त संघर्ष खूप गाजला .मोठे मोठे विद्वान या वादात उतरले अगदी लोकमान्य टिळक सुद्धा .पण या साऱ्या वादातून शाहू राजे बाहेर पडले आणि संकेश्वराच्या शंकराचार्यांनी शाहू छत्रपती हे क्षत्रियच आहेत असे सांगितले आणि या वेदोक्त वादावर पडदपडला. 1902 मध्ये शाहूराजे परदेश दौरा करण्यासाठी गेले. इंग्लंडला 26 जूनला राज्यारोहण सोहळा होता. सातवे एडवर्ड हे इंग्लंडचे राजा होणार होते .त्या समारंभासाठी शाहूराजे इंग्लंडला गेले आणि येताना पॅरीस, इटली,आदि देशांना जाऊन आले. तेथील ऐतिहासिक सौंदर्यपूर्ण वस्तू आणि संग्रहालय त्यांनी पाहिले. निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. भारतात आल्यावर त्यांनी आपले सर्व लक्ष राज्यकारभाराकडे केंद्रित केले.
' वेदोक्त' प्रकरणातून शाहू राजांना शूद्रांची दुःखे समजली. या माणसांना शिक्षण ,नाही रोजगार, नाही स्थिरता, नाही रोजगार. आपली सर्वसामान्य प्रजा सुखी झाली पाहिजे. हा त्यांचा ध्यास होता .मराठा समाजातील मुले शिकावीत म्हणूनअशा मुलांना राजवाड्यात ठेऊन त्यांनी प्रयोग केला. पण मुले काही शिकत नव्हती. याच सुमारास एक आनंददायी घटना घडली.
1899 मध्ये डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे शाहूमहाराज आपल्या चारचाकी घोडागाडीतून फेरफटका मारायला निघाले होते.शाहूमहाराजां बरोबर त्यांचे खास सेवक होते. ते वृत्तपत्र वाचता वाचता एकदम म्हणाले-
" महाराज, आनंददायी बातमी आहे."
"कोणती आनंददायी बातमी?वाचा तर खरे!"
" कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलचा विद्यार्थी पांडुरंग चिमणाजी पाटील राहणार वडगाव, हा मॅट्रिकची परीक्षा उत्तम रित्या पास झाला ."
शाहू महाराजांना आनंद झाला .त्यांनी या मुलाचा शोध घेतला. आपल्या ज्ञाती मधील मुलांपुढे पांडुरंगाचा आदर्श ठेवायला हवा! त्या मुलाला राजवाड्यात बोलावून त्याचा गौरव केला. त्यांच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था तर त्यांनी केलीच; परंतु मनात खून बांधली ,आता राज्यातील मुलांना शिकविण्यासाठी ची सारी तजवीज आपण करायला हवी.शाहूराजांच्या राज्यात ही शिक्षणाची छोटी धारा पुढे शिक्षणाचे तीर्थक्षेत्र बनली.
यातून काय बोध घ्याल?
लोक पालनाचे आणि लोककल्याणाचे काम शाहू महाराजांनी अतिशय समर्थपणे पार पाडले. शिक्षणाची गंगा तळागाळातल्या अडाणी गोरगरीबांना पर्यंत पोहोचविली आणि तोटे लक्षात घेऊन जातिभेद मिटवण्याचे प्रयत्न केले.
0 टिप्पण्या