संस्काराने घडतो मानव मानवाच्या जीवनात जडण-घडण ही त्याच्यावर होणाऱ्या संस्कारातून होत असते. शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे की माणूस काही गुण काही सवयी आपल्या वाडवडिलांकडून घेऊन येतो. पण त्याच्यावर खोल परिणाम होतो तो परिस्थितीचा.
लहान मुलाला मातीचा गोळा म्हणतात. कारण त्या वेळी त्याचे मन निरागस असते. संस्कारक्षम असते. त्या वयात त्याच्यावर जे संस्कार होतात त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व घडते. लहान मूल आपल्या भोवती घडणार्या गोष्टी पाहत असते. आणि त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते. ज्या घरातील माणसे आपल्या वडिलधाऱ्या माणसांना आदराने वागवत असतात. त्या घरातील छोटी मुले सर्व वडील माणसांशी प्रेमाने आदराने वागतात.ज्या घरातील कर्ते पुरुष घरातून बाहेर पडताना घरातील माणसांना आपण कुठे जात आहोत आणि केव्हा परत येणार आहोत याबाबत सांगतात. त्या घरातील मुले ही घराबाहेर पडताना सांगून बाहेर पडतात. आपल्याला मिळालेला खाऊ इतरांनाही वाटून द्यावा ही अगदी लहानपणी लावलेली सवय मोठेपणीही दिसून येते.
प्रत्येक मुलाच्या जीवनात शालेय शिक्षणाचे दिवस हे मंतरलेले असतात.शिक्षक ही त्याची आदर्श मूर्ती असते.शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण कळत-नकळत केले जाते. वेळेबाबत बंधने कटाक्षाने पाळणाऱ्या शिक्षकाचे शिष्यही वेळेची बंधने कटाक्षाने पाळतात. उत्तम हस्ताक्षर विनम्र संभाषण विनयशील वर्तन याचे संस्कारही या वयात घडतात.
आजच्या युगात भ्रष्टाचार हिंसाचार आणि दहशतवाद याचे प्रमाण वाढल्याने दर्शन घडते. तेव्हा लक्षात येते की येथे संस्काराचा व्हावा तसा परिणाम झालेला नाही.पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात आजोबा-आजी घरातील लहान मुलांवर सहजगत्या संस्कार घडवत. पण आजच्या विभक्त कुटुंबात आई-वडील स्वतःच्या कामात एवढे गुंतलेले असतात की त्यांना आपल्या मुलांसाठी आवश्यक तेवढा वेळ देता येत नाही मग त्यातूनच बिघडलेली पिढी निर्माण होते व नाना प्रश्न उभे राहतात.
0 टिप्पण्या