घरगुती पत्र लेखन क्रमांक 2


 सुट्टीचा सदुपयोग तुम्ही कसा करणार आहात यासंबंधी वडील भावास पत्र लिहा.

1001 जोशी वाडा,
माधव नगर,
कराड 415110,
दिनांक 15 फेब्रुवारी 2019.
तीर्थस्वरूप दादास,
तुझे पत्र मिळाले. तू माझ्या अभ्यासाची चौकशी केली आहेस. म्हणून मी आज तुला त्यासंबंधी सविस्तर पत्र पाठवत आहे.
तू पाठवलेली नवनीत ची मार्गदर्शक पुस्तके मला मिळाली. त्याचा मला चांगला उपयोग होत आहे. परीक्षेला फक्त पंधरा दिवस उरले आहेत. शाळेतील अभ्यास तर शिकवून पूर्ण झाला आहेत.आमच्या शिक्षकांनी प्रत्येक विषयाची दोन दोनदा उजळणी करून घेतली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी आमच्याकडून अनेक शाळांच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. मी साधारणतः प्रत्येक विषयाच्या तीन तीन प्रश्नपत्रिका उत्तरे लिहून लेखन सराव केला. आता माझा सर्व अभ्यास जवळजवळ पूर्ण झाला आहे.या पुढील पंधरा दिवसात मी मनन व पाठ्येतर लेखन यावर भर देणार आहे.
सुट्टीत मी मुंबईला यावे असे तू लिहितोस पण उन्हाळ्यात मुंबईचे वातावरण खूपच गरम व दमट असते.शिवाय यंदाच्या सुट्टीच्या कार्यक्रमाचा आराखडा मी अगोदरच आखला आहे. आमच्या शाळेतील इंग्रजीचे शिक्षक श्री लिमये हे सुट्टीत इंग्रजीचे खास वर्ग घेणार आहेत. सकाळचा दीड तासाचा कार्यक्रम तूर्त तरी ठरला आहे. दुपारी तीन ते सहा मी येथील नगर वाचनालयात जाणार आहे. केवळ वाचन करण्यासाठी नव्हे तर तेथे काम करण्यासाठी नगर वाचनालयातील पुस्तकांची मोजदाद व विषयवार मांडणी करायची आहे. त्यासाठी ग्रंथपालांना मदत हवी असल्याने ते काम करण्याचे मी मान्य केले आहे. याकामी माझ्याबरोबर माझे चार मित्रही आहेत. याशिवाय आपल्या शेजारी राहणारे प्रा.देसाई बारावीसाठी भौतिकशास्त्राचे पुस्तक तयार करणार आहेत. त्यांनीही मला हस्तलिखित तयार करण्यासाठी मदतीला बोलावले आहे.अशा तऱ्हेने या वर्षी मी सुट्टीचा आनंद वेगळ्या उपक्रमांतून लुटण्याचे ठरवले आहे. दादा हसू नकोस हा या सुट्टीत संध्याकाळी मी व्यायामासाठी आखाडयातही जाणार आहे.तेव्हा यंदा मी सुट्टीत मुंबईला येणार नाही. उलट आईचा तुलाच निरोप आहे की तूच रजा घेऊन इकडे ये नंदूला मी येथे पोहायला शिकवीन.
सौ वहिनी साष्टांग नमस्कार चिरंजीव नंदूला अनेक आशीर्वाद
तुझा,
छोटू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या