माझी आई आई पुढे स्वर्गाचेही महात्म्य थीटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे महात्म्य सांगताना म्हणतात इतरांनी कितीही प्रेम केले माया केली तरी त्याचे प्रसाद पट हे थीटे ठरतात. तसे आईचे नसते तिची माया कधी आटत नाही.अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.
माझी आई अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळे आहे. परवा शाळेतील विविध स्पर्धांमध्ये मला बक्षिसे मिळाली माझे हस्ताक्षर हे सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरली.याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला मजकूर पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.
मला आठवते मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या.मी परीक्षेला घाबरायचो कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो आणि आईने ओळखले याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने म्हणूनच मनात येते न ऋण जन्मदेचे फिटे.
माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या करिअरचा कधीच विचार केला नाही ती स्वतः एमएससी असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही मी आठवीत गेल्यावर तिने पीएचडी केली ती ही शिष्यवृत्ती मिळवून अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.
माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे कोण कोणत्या स्पर्धेत भाग घ्यावा याकडे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते.जिजाऊनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने ठसवला.तर भुदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून विनोबांची आई म्हणे विन्या आपल्या जवळ पाच घास असतील तर त्यातील एक तरी दुसऱ्याला द्यावा.
आई हा थोर गुरू आहे म्हणून तर बापूजी म्हणत एक आई 100 गुरुहूनी श्रेष्ठ आहे. आजच्या काळातला दहशतवाद भ्रष्टाचार या गोष्टी विषयी बोलत असताना परवा आई म्हणाली प्रत्येकाने लक्षात ठेवावे की प्रत्येकालाच असते आई खरेच एवढा विचार केला तर हिसंकाचे हात हिंसा करताना थबकतील.
आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते ज्याला लहानपणापासून आईचा विरह झाला असेल त्याचे केवढे दुर्भाग्य आहे. म्हणून कवी यशवंत म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी म्हणूनच या काळात उद्याच्या काळात आईचे महत्व तसेच राहणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या आईवर खूप प्रेम करावे.आई आपल्यावर तर प्रेम करतेच.
0 टिप्पण्या