चतुर म्हातारा
वाराणसी नगरातील राजाजवळ एक मोठे सुंदर रत्न होते. त्यामध्ये एक बारीक छिद्र होते. छिद्रात एक दोरा चिकटून बसला होता. तो काही केल्या कोणाला निघत नव्हता. अनेक सोनार कारागीर यांनी तो बाहेर काढण्यासाठी नानाप्रकारे प्रयत्न केले. पण त्यांना काही यश आले नाही.
मग राजाने आपल्या राज्यात सेवेत करांकरवी दवंडी दिली. ऐका हो ऐका आपल्या महाराजांजवळ एक मौल्यवान रत्न आहे. त्याच्या छिद्रामध्ये एक दोरा चिकटून बसला आहे. तो दोरा जो कोणी काढील त्याला योग्य बक्षीस महाराज देणार आहेत.हो...
ही दवंडी राज्यातील एका चतुर म्हाताऱ्याने ऐकली तो म्हातारा निराधार होता. तो फार थकला होता. उरलेले आयुष्य आता आपण कसे घालवणार अशी चिंता त्याला वाटत होती. कारण त्याच्या कडची सगळी पुंजी संपली होती. दवंडी ऐकताच आपणास चांगली संधी चालून आली असे वाटून तो मनात आनंदी झाला. लगेच तो काठी टेकत टेकत राजवाड्यात गेला. रत्नातला धागा मी काढतो म्हणाला. राजाने रत्न त्याच्याकडे दिले म्हाताऱ्याने थोडा मध मागितला. तो लगेच हजर करण्यात आला त्याने मधाचे काही थेंब नेमके त्या छिद्रांमध्ये सोडले. आणि ते रत्न जिथे मुंग्या होत्या तिथे नेऊन ठेवले. थोड्याच वेळात अनेक मुंग्या त्या रत्नात शिरल्या. त्यांनी तो मध खाल्लाच. पण तो दोराई खाऊन फस्त केला. दुसऱ्या बाजूने त्या बाहेर पडल्या. रत्नाचे छिद्र मोकळा झाल्याचे ते चिन्ह होते.
त्या म्हाताऱ्याने दुसरा दोरा त्या रत्नात ओवला व ते रत्न राजा कडे दिले. राजा फारच हर्षित झाला. त्याने म्हाताऱ्याला एक हजार सोन्याच्या मोहरा बक्षिस दिल्या.
तात्पर्य - आपल्या हुशारीचा वापर करण्याची संधी मिळताच तिचा लाभ घेतला पाहिजे.
0 टिप्पण्या