पहीला पाऊस


 पहीला पाऊस

पाऊस किती लहरी! जूनची सात तारीख सरली तरी पावसाचा पत्ता नव्हता.एवढेच काय पावसाचे कुठेही चिन्हे दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती.पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते? जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाडा अतिशय वाढला होता. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते. तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळ होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाचे आराधना करत होते. जमीन नांगरून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता.कृपा कर रे मायबापा! किती वाट बघायला लावशील ! काळी माय आसुसलेलीआहे रे तुझ्यासाठी.

एके दिवशी अचानक सभोवार अंधारुन आले .सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर चमकून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. आला का रे तो घननीळ.आणि अचानक पाऊस कोसळू लागला.टपोरे थेंब बरसून लागले.खूप उशीर झाल्यामुळे त्यांना कोसळण्याची घाई झाली होती.हा काळ्या ढगांचा तानसेन जनु मेघमल्हाराच्या तानाघेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे तो संतापला असावा. म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता.तीन तासानंतर पाऊस ओसरला. अचानक आला तसा अचानक थांबला.
केव्हढा किमयागार हा पहिला पाऊस !भोवतालच्या वातावरणात किती तरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे ढग हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती नववधू सारखी दिसत होती.पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते.झाडात दडलेली पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडत जनु वर्षारानीचे आभार मानत आहे.सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते असा हा किमयागार पहिला पाऊस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या