सर्कशीतील हत्तीचे आत्मकथन


 सर्कशीतील हत्तीचे आत्मकथन

ऐका, मी सर्कशीतला एक वृद्ध हत्ती बोलतोय.या वार्धक्यात माझ्यापुढे हा केव्हढा प्रश्न उभा राहिला आहे. मी आता कुठे जाऊ ना घर का ना घाट का अशी माझी अवस्था झाली आहे. तुम्हाला माझी सर्व कहाणी मी आता सांगतो.
शरावती खोऱ्यातील अभयारण्यात माझा जन्म झाला. अतिशय निसर्ग संपन्न असे ते अरण्य होते. हिरव्यागार रानात खेळताना किती मजा येत होती. काही काळ आई-वडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रमू लागलो.पाण्यात डुंमणे हा माझा सर्वात आवडता खेळ होता.अरण्यात खाण्यापिण्याची चंगळ होती.मस्त पाण्यात डुंबायचे रानातील आवडणारी झाडे मनसोक्त खायची आणि मग निळ्याशार आकाशाखाली गार झोपायचे. रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचे. असे होते ते मस्त जीवन पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले.कारण एके दिवशी मी पकडला गेलो.त्यालाही कारण माझ्या डुंबण्याचा छंद होता.
आजही मला तो दिवस आठवतो. आम्ही सर्व दोस्त मंडळी पाण्यात डुंबत होतो. काही वेळानंतर माझ्या बरोबरचे मित्र पाण्याबाहेर गेले पण माझी हौस फिटली नव्हती. मी एकटाच पोहत पोहत दूर गेलो माझ्या लक्षात आले नाही की मी अभयारण्यापासून खूप दूर आलो आहे. पोहतांना एका ठिकाणी माझे पाय अडकले. मला वाटले शेवाळ असेल पण छे ! पाय सुटेनात कारण ती शेवाळ नव्हते तर जाळे होते.थोड्याच वेळात काही लोक आले त्यांनी भल्यामोठ्या दोरखंडात मला जखडले आणि माझी वरात शहराकडे निघाली.
त्या क्षणापासून गुलामी सुरू झाली. स्वातंत्र्य हरपले होते. एका सर्कशीत माझी वर्णी लागली. भलीमोठी सर्कस होती ती.भरपूर प्राणी आणि तेवढेच कसरतपटू .सकाळपासून सराव चाले सर्वात लहान म्हणून माझे खूप कौतुक होत असे. मला सांभाळणारा माहुतही बच्चा-बच्चा म्हणून माझे खूप प्रेमाने लाड करी.त्यावेळी मला काही काम नसे. आणि अजून माझ्या पायात साखळदंडही पडला नव्हता.म्हणून मी त्या जगण्यातही रमून गेलो.
जसा मी मोठा होत गेलो तसतसा माझा अभ्यासक्रम सुरू झाला.माझ्यातील हूडपणा कमी होत नव्हता. मग अनेकदा चाबकाचे फटके बसू लागले. अंकुशाची टोचणी सहन करावी लागली.शेवटी मला कळून चुकले की आता आपल्याला येथेच राहावयाचे आहे. हुडपणा करून काही उपयोग नाही. मग मी खेळाचे सर्व प्रकार झटपट शिकून घेतले. रिंग मास्तरचा प्रत्येक शब्द मी ऐकू लागलो.
आजही मला सर्कशीच्या तंबूतला माझा पहिला दिवस आठवतो. त्या दिवशी मला खास सजवण्यात आले होते. अंगावर मखमली झुल व चमकणारी चांदीचे दागिने घालण्यात आले होते. माझा मास्तर मला इंद्रा म्हणून हाक मारत असे. मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वतः मला रिंगणात नेले आणि त्याच्या आज्ञेनुसार मी एका पाठोपाठ एक खेळ केले. मास्तर एवढा खूश झाला की परत आल्यावर त्यांनी मला पुडाभर पेढे चारले.
अशी कित्येक वर्षे मी अशीच काढली.माझ्या सर्व खेळातील गणेश पूजेचा खेळ मला विशेष आवडे. प्रेक्षक खूप टाळ्या वाजवत. मग मी पण देहभान विसरून काम करी. आता अरण्यातील स्वातंत्र्याचा विसर पडला होता.मी म्हातारा झालो होतो.त्यातच भर म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या संस्थेने सर्कशीतील प्राण्यांचा खेळावर भूतदयेने आक्षेप घेतला मला मुक्त करण्यात आले. आता इतक्या वर्षांनी मी अरण्यातही जाऊ शकत नाही. म्हणून या शिवालया बाहेर कसेतरी दिवस काढत आहे. पूर्वीचा रुबाब नाही ही पूर्वीची चैन नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या